▶ वैज्ञानिक नामदेव तोगरे यांनी जागविली यशाची उमेद
वैज्ञानिकांचे मध्यरात्री ग्रामीण विद्यार्थ्यांना मार्गदर्शन
कन्नड, (प्रतिनिधी): जिद्द, चिकाटी आणि योग्य मार्गदर्शनाच्या जोरावर ग्रामीण भागातील विद्यार्थीही जागतिक स्तरावर चमकू शकतात, याचा जिवंत वस्तुपाठ मेरिकेतील ज्येष्ठ वैज्ञानिक नामदेवराव तोगरे यांनी अंधानेर येथील विद्यार्थ्यांना घालून दिला. जिल्हा परिषद प्रशाला, अंधानेर (ता. कन्नड, जि. छत्रपती संभाजीनगर) येथील इयत्ता ८ वी आणि ९ वी च्या विद्यार्थ्यांसाठी आयोजित विशेष ऑनलाईन मार्गदर्शन शिबिरात ते बोलत होते.
विशेष म्हणजे, भारतात शाळेतील शिबिराची वेळ सकाळी ११ ची असताना अमेरिकेत मध्यरात्रीचे १२ ते २ पर्यंत ते ऑनलाईन मार्गदर्शन करत होते. केवळ आपल्या मातीतील मुलांचे भविष्य उजळावे, या तळमळीपोटी तोगरे सरांनी स्वतःच्या झोपेचा त्याग करून विद्यार्थ्यांना इत्यंभूत मार्गदर्शन केले. त्यांच्या या कार्याची दखल खुद्द देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनीही यापूर्वीच घेतलेली असून त्यांनी तोगरे सरांच्या कार्याची प्रशंसा केलेली आहे. आज प्रशाला अंधानेरच्या विद्यार्थ्यांना त्याची प्रचिती मिळाली. अनुभूती घेतली. ते म्हणाले इंग्रजीचा बाऊ करू नका ३५ गुणांवरून वैज्ञानिकापर्यंतचा प्रवास मराठी शाळेतील विद्यार्थ्यांच्या मनात इंग्रजी भाषेबद्दल मोठी भीती असते. हा न्यूनगंड दूर करताना तोगरे सरांनी स्वतःचे उदाहरण दिले.
मला दहावी बारावीत इंग्रजीत केवळ ३५ ३७गुण होते, पण जिद्दीने आज मी अमेरिकेत वैज्ञानिक म्हणून कार्यरत आहे. त्यामुळे भाषेची अडचण यशाच्या आड येऊ देऊ नका, असे सांगत त्यांनी विद्यार्थ्यांमध्ये प्रचंड आत्मविश्वास फुंकला. या सत्रात तोगरे सरांनी महत्वपूर्ण विषयांवर सखोल मार्गदर्शन केले.
शालेय जीवनापासूनच, सारख्या परीक्षांची तयारी कशी करावी? १० वी आणि १२ वी नंतर केवळ पारंपरिक वाटा न निवडता नवनवीन कोर्सेसची निवड कशी करावी? केंद्र व राज्य सरकारच्या विविध शिष्यवृत्ती आणि त्यांचा लाभ घेण्याची प्रक्रिया. गरिबातील गरीब मुलगाही सरकारी मदतीने परदेशात शिक्षण कसे घेऊ शकतो, याची सविस्तर माहिती दिली. या नाविन्यपूर्ण
कार्यक्रमाचे आयोजन प्रशालेच्या शिक्षकांनी केले होते. यावेळी मुख्याध्यापक राजीव जाधव, शिक्षक वृंद आणि इयत्ता ८ वी व ९ वी चे विद्यार्थी मोठ्या संख्येने उपस्थित होते.
विद्याथ्यर्थ्यांनी विचारलेल्या प्रत्येक प्रश्नाचे तोगरे सरांनी पूर्ण समाधान होईपर्यंत उत्तरे दिली. एका जागतिक दर्जाच्या वैज्ञानिकाकडून थेट मार्गदर्शन मिळाल्याने विद्यार्थी भारावून गेले होते. कार्यक्रमाच्या शेवटी विद्यार्थ्यांनी नामदेव तोगरे सरांचे मनापासून आभार मानले. या कार्यक्रमाचे आयोजन माध्यमिक शिक्षक संजय केवट यांनी केले होते. कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी मुख्याध्यापक राजीव जाधव यांनी मोलाचे मार्गदर्शन केले. तर ऑनलाईन प्रक्रियेचे पूर्ण तांत्रिक सहकार्य प्रशालेचे जावेद पटेल यांनी केले. जागतिक वैज्ञानिक नामदेव तोगरे सरांचे सहाय्यक यादव बल्लूरे, प्रियंका भोज, योगेश साळुंके यांनी विशेष सहकार्य केले.












